आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद म्हणजे आपली तरुण पिढी. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे, जिथे कोट्यवधी तरुण आपल्या स्वप्नांसह आणि ऊर्जेसह देशाची दिशा ठरवत आहेत. तरुण हे फक्त भविष्य नाहीत, तर वर्तमानाची धडधड आहेत. त्यांच्या विचारांमध्ये, मेहनतीत आणि संकल्पामध्ये भारताला नवीन उंचीवर नेण्याची ताकद आहे.

युवा शक्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा उत्साह आणि धैर्य. या वयात ते स्वप्ने पाहण्याचे धाडस करतात आणि ती पूर्ण करण्याची ताकदही त्यांच्याकडे असते. ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली गेली, तर अशक्यही शक्य होऊ शकते. इतिहास याचा साक्षी आहे – जेव्हा जेव्हा देशाला नवीन दिशा देण्याची गरज भासली, तेव्हा तेव्हा तरुणांनीच नेतृत्व केले आहे. स्वातंत्र्य संग्रामात भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाबू गेनू यांसारख्या तरुणांनी देशाला जागं केलं. आजच्या डिजिटल आणि जागतिक युगातही हाच जोश भारताला पुढे नेत आहे.

आज राष्ट्रनिर्मिती फक्त राजकारण किंवा अर्थव्यवस्थेपुरती मर्यादित नाही. शिक्षण, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती आणि पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. प्रत्येक क्षेत्रात तरुणांची भूमिका निर्णायक आहे. एक सुशिक्षित, जागरूक आणि संस्कारी तरुण समाजाचे चित्र बदलू शकतो. शिक्षण हेच ते भक्कम पायाभूत साधन आहे जे तरुणांना राष्ट्राबद्दल जबाबदार बनवते.

पण युवा शक्तीचा खरा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा आधुनिक ज्ञानासोबतच शिस्त आणि परंपरांची जाण त्यांच्यात असेल. केवळ वैयक्तिक यश हेच राष्ट्रनिर्मितीचे उद्दिष्ट नाही. समाज आणि देशाची सामूहिक प्रगती हेच खरे राष्ट्रनिर्माण आहे.

मला अभिमान आहे की मीरा-भाईंदरमधील तरुण या दिशेने सातत्याने पुढे जात आहेत. शिक्षण, क्रीडा, कला किंवा सामाजिक सेवा – प्रत्येक क्षेत्रात येथील तरुणांनी वेळोवेळी सिद्ध केलं आहे की संधी मिळाल्यास ते चमत्कार घडवू शकतात. आणि हे फक्त मीरा-भाईंदरपुरते मर्यादित नाही. आपल्या संपूर्ण देशातील तरुण आज विज्ञान, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, सेना, क्रीडा आणि कलेच्या क्षेत्रात भारताचं नाव उज्ज्वल करत आहेत. ही आहे नव्या भारताची नवी ओळख.

माझा ठाम विश्वास आहे की राष्ट्रनिर्मिती ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. त्यात प्रत्येक तरुणाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जर प्रत्येक तरुणाने आपल्या आजूबाजूच्या समस्यांच्या समाधानात योगदान देण्याचा निश्चय केला, तर मोठा बदल घडून येणारच. स्वच्छता अभियान असो, पर्यावरण संवर्धन असो, शिक्षणाचा प्रसार असो, महिला सुरक्षा असो किंवा समाजसेवा – प्रत्येक क्षेत्रात बदल घडवण्याची ताकद ही तरुणांच्या उर्जेमध्येच आहे.

आज आपण सर्वांनी मिळून हा संकल्प केला पाहिजे की आपण तरुणांना केवळ रोजगार आणि संधीच देणार नाही, तर त्यांना योग्य दिशा आणि संस्कारही देऊ. माझ्या मीरा-भाईंदरमधील तरुणांना मी हेच आवाहन करतो की ते केवळ स्वतःच्या स्वप्नांसाठी नाही तर समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी काम करतील. तसेच मी देशभरातील तरुणांना हेच संदेश देऊ इच्छितो की त्यांनी आपल्या विचारांनी आणि कृतींनी भारताला आत्मनिर्भर, सक्षम आणि विश्वगुरु बनविण्यासाठी आघाडीची भूमिका निभवावी.

युवा शक्तीच्या जागरणातूनच नव्या भारताची निर्मिती होईल. हाच तो काळ आहे की आपण सर्वांनी मिळून आपल्या तरुणांच्या उर्जेला सकारात्मक दिशा द्यावी आणि त्यांना समाज व राष्ट्रसेवेला आपलं कर्तव्य मानण्याची प्रेरणा द्यावी.

मला खात्री आहे की येत्या काळात भारताचे तरुण आपल्या धैर्य, ज्ञान आणि संस्कारांच्या जोरावर जगाला नवी दिशा दाखवतील आणि आपला देश अधिक सक्षम व समृद्ध बनेल.